Tuesday, February 1, 2022

पुस्तक परिचय: जावे त्यांच्या देशा / पु. ल. देशपांडे




माझ्या पायावर चक्र आहे की नाही ते मला ठाऊक नाही. पण मला येणारे प्रवासाचे योग पाहिल्यावर एखाद्या ज्योतिष्याला पाय दाखवावेसे वाटायला लागले आहे. एक गोष्ट मात्र खरी. मी मायदेशात तसा बैठा माणूस आहे. परदेशात मात्र खूप हिंडतो. अधाश्यासारखा पाहतो आणि ऐकतो. नव्हे, पाहण्यासाठी हिंडतो. कुठे काय ऐकण्यासारखे आहे ते शोधत जातो. आणि जे काही ऐकले-पाहिले ते सांगायची मला ओढ लागते. आणि त्यातूनच माझे हे सांगणे ऐकणारेही भेटत आले आहेत हे माझे भाग्य!


ना वंशाचे, ना भाषेचे, ना धर्माचे, ना राष्ट्राचे असे कितीतरी लोक ह्या प्रवासात यथा काष्ठं च काष्ठं च म्हणतात तसे भेटतात. स्नेहाचा हात पुढे करतात. अकारण मने मोकळी करतात. आपल्या घराची दारे मोकळी करतात. कोण कुठला जर्मन आबिल, कुठली स्कॉटिश ब्रॉमलेबाई, हंगेरीतला गेझाकाका, पोन्नानेनी, डॉ. बेंके योशेफ आणि त्याची थेट पर्‍यांच्या राज्यातून उतरलेली छोटी एस्थेर... पुन्हा दिसणार देखील नाहीत... मन:पटलावर कायमची चित्रित झालेली पॅरिसमधल्या सीनच्या तीरावरची संध्याकाळ, कोण्या जपानी गेशाचा कानात वर्षानुवर्षे रेंगाळणारा तो ‘सायोनाऽऽरा’!...अनपेक्षितपणाने दिसलेला तो रोदांचा ‘थिंकर’... बर्लिनच्या ऑपेराहाऊसमध्ये ‘बार्बर ऑफ सॅव्हिली’च्या नांदीचे अप्रतिम वाद्यसंगीत ऐकताना अर्जेंटिनातल्या मारियाचे डबडबलेले निळे निळे डोळे... प्रतिभेचे थोर देणे लाभलेल्या एखाद्या साहित्यकाराने ह्यातून शब्दांची कितीतरी मोठी शिल्पे उभी केली असती-ती ताकद माझ्यात नाही याची मला जाणीव आहे. हा माझा विनय वगैरे नाही. भव्य कलाकृतींच्या दर्शनातून मला लाभलेले हे शहाणपण आहे. तरीही लिहिल्यावाचून राहवत नाही म्हणून हे पांढर्‍यावर काळे.

~ पु. ल. देशपांडे

Featured Posts

November 2024: Top News Articles

Ø गेट परीक्षार्थींना अर्ज सुधारण्याची संधी     Maharashtra Times dt. 05/11/2024   Ø 'पेट' चे प्रवेश अर्ज भरण्यास अंतिम मुदतवाढ   ...